गुहागर-परचुरी बस पांगारी सडेवाडी मार्गावर कलंडली

गुहागर : गुहागरहून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी गुहागर-परचुरी एस.टी. बस पांगारी सडेवाडी येथून येत असताना सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या एका बाजूला ही बस कलंडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

गुहागर-परचुरी (एमएच-१४-बीटी-२४३८) ही बस सकाळी ७.४५ वाजता गुहागर आगारातून चालक व्ही. एम. पाटोळे हे घेऊन परचुरीकडे आले. दरम्यान पांगारी सडेवाडी येथून विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन येत असताना ही बस रस्त्याच्या एका बाजूला जाऊन कलंडली. सुदैवाने यावेळी एस. टी. बसला कोणत्याही झाडाचा आधार नसताना देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली नाही. यावेळी प्रसंगावधान राखून वाहक आर. के. सोनकांबळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तत्काळ विद्यार्थी व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, या अपघाताची बातमी कळताच सामाजिक कार्यकर्ते अब्रार चोगले, सत्यवान देरदेकर, रामचंद्र आडविलकर, विलास गमरे, पोलिसपाटील, सरपंच प्रतीक्षा भुवड, शिक्षक श्री. धनावडे, ग्रा.पं. सदस्य अविनाश गमरे, ग्रामसेविका गावित, संजय भुवड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन तासांनंतरही उपाययोजना नाही
ग्रामस्थ अब्रार चोगले यांनी अपघाताची माहिती गुहागर आगारामध्ये दूरध्वनीद्वारे तत्काळ दिली. मात्र २ तास उलटूनही या ठिकाणी आगाराकडून एसटी बस काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. त्यानंतर उशिराने क्रेनच्या सहाय्याने सदर बस काढण्याचे प्रयत्न सुरू होते. गुहागर आगाराच्या कारभाराबाबत येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 09/Jul/2025