कोमसाप मालगुंड शाखेतर्फे २६ जुलै रोजी ‘श्रावणधारा मनामनात’ उपक्रम

गणपतीपुळे : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा -मालगुंड, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड, कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुंड आणि युवाशक्ती शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणधारा मनामनात या उपक्रमाचे आयोजन २६ जुलै २०२५ रोजी कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे करण्यात आले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, सहभागी होणार आहेत. या प्रत्येक शाळा, महाविद्यालयातून प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. यावेळी शालेय गट आणि महाविद्यालयीन गटातील प्रत्येक स्पर्धकाने पाऊस या विषयांवर, मराठी भाषेत, स्वतः लिहिलेली ३ ते ४ कडव्याची कविता, प्रस्तावना न करता सादर करायची आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सहभागी कवींना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या दोन कवींना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध साहित्यिक उपक्रमात, मान्यवर कवींच्या उपस्थितीत कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी शालेय गटासाठी शुभदा मुळ्ये, विलास राणे, उज्जवला बापट, शालेय-महाविद्यालयीन गटासाठी अरुण मोर्ये तर खुल्या गटासाठी रामानंद लिमये व अमेय धोपटकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 09/Jul/2025