चिपळूण : गेली दोन वर्षे पुलाजवळ गणपती विसर्जन घाटाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. यंदादेखील जर प्रशासनाने गणपती विसर्जन घाट न उभारल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला आहे.
शहरातील बहादूरशेख व कळंबस्तेजवळील जुने दोन पूल तोडल्यामुळे नव्याने बांधलेल्या पुलाजवळ जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही. याठिकाणी ओझरवाडी, मवतवाडी, मोकंबवाडी, गांधी नगर, कळंबस्ते, येशील आदी परिसरातील हजारो नागरिक गणेश विसर्जनासाठी येत असतात.
या भागात विसर्जनासाठी योग्य ठिकाण निश्चित करून विसर्जन घाट बांधण्याची मागणी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करून नियोजन किंवा उपाययोजना केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. २५ ते ३० दिवसांच्या आत जर विसर्जन घाटाच्या बांधकामास सुरुवात झाली नाही तर आम्ही सर्वपक्षीय आंदोलन छेडू, असा इशाराही मुकादम यांनी दिला आहे. त्याबाबतचा लेखी पत्रव्यवहार त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग विभाग, पोलिस प्रशासन, उपविभागीय अधिकारी आणि चिपळूण न.प. मुख्याधिकारी यांना केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 09/Jul/2025














