किरबेट येथील एका पुलाचे काम अपूर्ण

साखरपा : किरबेट येथील एका पुलाचे काम गेले काही महिने अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांना वाहतुकीसाठी त्रास होत आहे. त्यामुळे हा पूल तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. किरबेट गावात जाणारा एक पूल गेले काही महिने अर्धवट अवस्थेत आहे. नव्याने बांधण्यासाठी म्हणून पुलाचे काम सुरू झाले; पण गेले काही महिने ते अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे किरबेट बौद्धवाडी, सुतारवाडी तसेच देवडे येथील गवळीवाडी, बौद्धवाडी, रोहिदासवाडी अशा पाच वाड्यांच्या वाहतुकीवर पूर्णतः परिणाम झाला आहे.

त्यामुळे त्यावरून वाहतूक करणाऱ्या ग्रामस्थांना सध्या वाडीत आणि घरी जाण्यासाठी चक्क पायवाटेचा उपयोग करावा लागत आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदारवर्ग यांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब ग्रामस्थ हर्षद पांचाळ यांनी आमदार किरण सामंत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरूख यांच्या निदर्शनास आणून दिली. तसे निवेदनही पांचाळ यांनी दिले आहे. हा अपूर्ण अवस्थेतील ब्रीज तत्काळ बांधून पूर्ण करावा, अशी मागणी पांचाळ यांनी निवेदनात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 09/Jul/2025