होमिओपॅथिक डॉक्टरांविषयीचा ‘तो’ निर्णय मागे घ्यावा : डॉ. कांचन मदार यांची मागणी

चिपळूण : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार, ‘समकालीन औषधशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅधिक डॉक्टरांना वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची मुभा दिली आहे. हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गंभीर असून, रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारा आहे. तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला विभागाच्या संयोजिका डॉ. कांचन मदार यांनी सांगितले.

शासन निर्णयाचा निषेध करताना डॉ. मदार म्हणाल्या, होमिओपॅथिक डॉक्टरांनी केवळ एक वर्षाचा समकालीन औषधशास्त्र अभ्यासक्रम (CCMP) पूर्ण केल्याने त्यांना ‘वैद्यकीय’ अधिकारी समजणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. एमबीबीएस ही पाच वर्षांची कठीण आणि शिस्तबद्ध पदवी आहे. अशा तात्पुरत्या अभ्यासक्रमातून पूर्ण वैद्यकीय शिक्षणाची समकक्षा साधुता येऊ शकत नाही. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद केवळ एमबीबीएस व तत्सम वैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांसाठी आहे.

होमिओपथिक डॉक्टरांना स्वतंत्र परिषद अस्तित्वात असताना त्यांना वैद्यकीय परिषदेच्या यादीत सामावून घेणे म्हणजे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे.

या निर्णयामुळे दोन पूर्णपणे वेगळ्या उपचारपद्धतीच्या डॉक्टरांना एकाच व्यासपीठावर आणल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर आणि उपचार प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या अन्यायकारक निर्णयावर त्वरित पुनर्विचार झाला पाहिजे. विधानसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, होमिओपॅथिक डॉक्टरांनी त्यांचे कार्य त्यांच्या परिषदेतर्गत करावे. त्यांना वैद्यकीय परिषदेतील नोंदणी देऊ नये; अन्यथा राज्यभरातील आधुनिक वैद्यकीय डॉक्टर आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 09/Jul/2025