मंडणगड बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य

मंडणगड : येथील मंडणगड बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे या बसस्थानकाचे नाव खड्डे स्थानक म्हणून झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर हे खड्डे बुजवणे आवश्यक होते; परंतु आगार व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मंडणगड आगार व्यवस्थापनाकडून येथे उत्तम पायाभूत सुविधा देण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील दुकानदारांसह बसस्थानकात येणाऱ्या तालुक्यातील लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील आगारातून उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधणारे व्यवस्थापन परिसरातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे. एसटी महामंडळाच्या स्वनिधीतून बसस्थानक परिसरात विविध सोयी देणे बंधनकारक आहे. येथील बसस्थानक आवारातील स्वच्छतागृह नादुरुस्त असून ते बंद ठेवण्यात आले आहे. तेथील दुर्गंधीने प्रवासी हतबल झालेले आहेत. या परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना आगार व्यवस्थापनाने केलेल्या नाहीत. बसस्थानक आवारात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून दानशूर व्यक्तीने निर्माण केलेली व्यवस्थाही गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ती कार्यान्वित करण्याची तसदी आगार व्यवस्थापनाने घेतलेली नाही.

बसस्थानक आवारातील खड्डे दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक निधीचा वापर करून बुजवण्यात आले होते.

स्तनदा मातांसाठी स्वतंत्र व्यवस्थेचा अभाव
महिला, गरदोर माता, स्तनदा माता यांच्याकरिता कायद्यात तरतूद असतानाही स्वतंत्र व्यवस्था नाही. अनेकदा स्तनदा माता आपल्या बाळांना बसस्थानकात मिळेल त्या ठिकाणी स्तनपान करताना दिसतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 09/Jul/2025