चिपळूण नगर परिषदेत पाणीपुरवठा अभियंता पद रिक्तच

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेत महत्त्वाच्या विविध विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून, बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता व कर प्रशासकीय सेवा आदी प्रमुख विभागातून शासनाच्या केडर अंतर्गत नियुक्ती झालेले कर्मचारी न. प.त कार्यरत झाले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या विभागात आता प्रमुख अधिकारी व अभियंते मिळाल्याने कामकाज सुरळीत होईल. मात्र, अद्यापही बांधकाम विभागात नगर अभियंता, सहायक अभियंता तसेच पाणीपुरवठा अभियंता यांची नियुक्ती झालेली नाही.

या नव्या नियुक्तीमुळे चिपळूण नगर परिषदेत प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांत महत्त्वाच्या विभागातील आस्थापनासहीत विभागप्रमुख, अभियंते व कर्मचारी हे बदली होऊन अन्य ठिकाणी गेले होते. त्यामुळे अशा विभागातून ठेकेदारामार्फत सेवातत्त्वावर तसेच प्रभारी अधिकारी व विभागप्रमुख म्हणून कामकाज सुरू होते.

शहरात महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. शासनाच्या करोडो रुपये निधीच्या माध्यमातून हे प्रकल्प न.प. प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहेत. प्रामुख्याने शहराला ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा करण्याची शासनाने मंजूर केलेली योजना आता केवळ प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याच्या टप्प्यात आली आहे. मात्र, ऐन टप्प्यात असलेल्या योजनेला गती मिळण्याची अपेक्षा आता धूसर झाली आहे. कारण, या विभागात पाणीपुरवठा अभियंता असलेले पद रिक्त झाले असून, येथील अभियंता अन्य न.प.त बदलीवर गेले आहेत तर शासनाकडून बदली अभियंत्याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे महत्त्वाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या योजनेचे कामकाज आता प्रभारी अभियंत्यांच्या माध्यमातून करून घ्यावे लागेल. प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब म्हणजे बांधकाम विभागात स्थापत्य अभियंत्यांची झालेली नियुक्ती होय. कोयना येथील दीपक निंबाळकर, विद्युत अभियंता म्हणून पेण येथील संगिता तांबोळी, संगणक विभागात संगणक अभियंता म्हणून लांजा येथील निवेदिता आंबेकर, कर व प्रशासकीय सेवा विभागात कराड येथील सागर शेडगे आदी नियुक्ती झाल्या आहेत. मात्र, अद्यापही पाणीपुरवठासहीत बांधकाम विभागातील नगर अभियंता व सहायक अशी पदे नियुक्त होणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 16/Oct/2024