चिपळूण : चिपळूण शहरासह परिसरातील गावांना प्रतीक्षा असलेल्या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेचे काम प्रगतिपथावर आहे. धरणापासून चार किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तसेच या योजनेंतर्गत विविध भागांतील साठवण टाक्यांचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित कामाला पावसाळ्यानंतर वेग येईल, असे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले.
सुमारे २० वर्षांनंतर १५५ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार या योजनेचे काम नाशिक येथील श्रमगाथा असोसिएशनमार्फत सुरू आहे. कोळकेवाडी धरणाच्या १११.५० मीटर उंचीवर असलेल्या आऊटलेटमधून चिपळूण शहरासाठी थेट पाणी उचलले जाणार आहे. तेथून १६ किलोमीटर अंतराच्या पाईपलाईन खेड येथील १०६ मीटर उंचीवर असलेल्या नियोजित साठवणटाकीत हे पाणी आणले जाणार आहे. पुढे डीबीजे महाविद्यालय (६८.६० मीटर उंचीवर), पाग (७६.६७ मीटर उंची), गुहागर बायपास (५६.३० मीटर उंची व गोवळकोट येथील ५६.३० मीटर उंचीवर असलेल्या साठवण टाकीत एकावेळी ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या साठवण टाक्यांमधून शहरातील सहा विभागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराच्या प्रत्येक भागात पाच ते सहा मजल्यावर ग्रॅव्हिटी योजनेतील पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. कोळकेवाडी धरणापासून शहरात ७०० मिलिमीटरची पाइपलाइन टाकली जाणार आहे. तेथून पुढे ४०० व ३५० मिलिमीटर असणार आहे. खेर्डी येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या १०० गुंठे नियोजित जागेत ११.५ लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने उभारण्यात येणार असूर, त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी खेर्डी येथे आधीच्या ५७५ लाख लीटर क्षमतेच्या साठवण टाकीसोबत ११५ लाख लिटरची नवीन साठवण टाकी उभारली जाणार आहे. याच पद्धतीने डीबीजे महाविद्यालय येथे ५.५६ लाख लिटर व गोवळकोट येथे ३.७५ लाख लिटर क्षमतेची नवीन साठवण टाकी उभारली जाणार आहे.
त्याव्यतिरिक्त पाग येथील चार लाख लिटर, गुहागर बायपास येथील आठ लाख लिटर व गोवळकोट येथील सात लाख लिटरच्या जुन्या साठवण टाक्यांचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत पाइपलाइनसह साठवण टाक्यादेखील नव्याने उभारल्या जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 09/Jul/2025














