खोट्या माहितीद्वारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा प्राप्त करणार्‍या शाळांची चौकशी होणार : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई : शासकीय लाभ मिळवण्यासाठी राज्यातील काही शाळांनी खोटी माहिती देऊन ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी ९ जुलै या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केला.

यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विशेष मोहीम घेऊन याविषयी चौकशी केली जाईल. त्याकरिता समितीची स्थापनाही केली जाईल, अशी घोषणा सभागृहात केली.

‘अल्पसंख्यांक’ दर्जा प्राप्त करण्यासाठी शाळेत किमान ५० टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी असणे आवश्यक आहे. राज्यात काही शाळांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या अल्प असतांनाही ‘अल्पसंख्यांक’ दर्जा देण्यात आला आहे. विशेषत: अमरावती आणि मुंबई येथे अल्पसंख्याक शाळांमध्ये १० ते २० टक्केही अल्पसंख्यांक विद्यार्थी नाहीत. अल्पसंख्यांक शाळेचा दर्जा प्राप्त झाल्यावर सेवाज्येष्ठतेनुसार पदांची भरती करता येते, इतर मागासवर्गीय समाजाव्यतिरिक्त अन्य समाजातील व्यक्तींना आरक्षण मिळत नाही. त्यामुळे काही शाळांनी खोट्या माहितीच्या आधारे अल्पसंख्यांक दर्जा मिळवला आहे. यामुळे सरकारची मोठी हानी होत आहे, असे प्रशांत बंब म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 09-07-2025