लांजा : लांजा पोलिसांनी तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागात दोन दिवस अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. धाडसत्र असेच सुरू राहिल्यास अवैध धंद्यांवर लवकरच लगाम बसण्याची शक्यता आहे. लांजा पोलिस स्थानकाचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी लांजाची सूत्रे हाती घेताच अवैध धंदे व्यावसायिकांना एकप्रकारे धडकी भरली आहे. अवैध धंद्याविरोधातील पोलिसांच्या कारवाईचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
लांजा तालुक्यात महिनाभरात तब्बल १० ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू धंदे उघडकीस आणल्याने अवैध धंदे व्यावसायिकांमध्ये चलबिचल झाली आहे, यापूर्वी अवैध धंद्यांना कोणाचा आशीर्वाद सुरू होता असाही प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.
पोलिसांकडून यापूर्वी अशी कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र तसे दिसून आलेले नाही. मुंबई-गोवा महामार्गालगत लांजा शहर व ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या बेकादेशीर हातभट्टी गावटी दारू विक्री व मटका विरोधात लांजा पोलिसांनी टाकलेले धाडसी पाऊल कौतुकाचा विषय बनला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे चालवणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे लांजा तालुक्यातून स्वागत होत आहे. मात्र पोलिसांनी केलेली कारवाई ही निःपक्षपाती आणि सातत्यपूर्व असावी, अशी मागणी जनतेतून केली जाते आहे.
लांजा पोलिस स्थानकाचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे तालुक्यातुन कौतुक होते आहे. लांजा शहरातील दोन तर भांबेड येथील एक अशा दोन मटका व्यावसायिकांवर तर शिपोशी, कोट, पुनस, महामार्गावर देवधे फाटा, सापुचेतळे, जावडे, भांबेड आशा दहा ठिकाणी गावठी हातभट्टी दारू विक्री व बाळगल्याप्रकरणी धाडी टाकून लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे.
कारवाईत सातत्य राहावे
लांजा पोलिस आणि अवैध धंदे विरोधात उचललेले पाऊल कौतुकास्पद असून पोलिसांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या कारवाईत सातत्य राहावे, अशी मागणी होत आहे. तसेच अवैध धंदेमुक्त तालुका लवकरच पाहायला मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होते आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 16/Oct/2024











