रत्नागिरी : जिल्ह्यातील चार तालुक्यातील ४१५ साकव मोडकळीला..

रत्नागिरी : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील साकव दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच नादुरुस्त साकवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये ४१५ साकव मोडकळीस आले आहेत. या साकवांची दुरुस्ती आणि पुनर्बाधणीसाठी ३० कोटी १ लाख १४ हजार रुपयांची गरज आहे. धोकादायक बनलेल्या या साकवांवरून आजही रहदारी सुरू असून, पुण्याप्रमाणे दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न केला जात आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावर ग्रामस्थांच्या सोयीसाठी साकव बांधण्यात आले आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे साकव मोडकळीस आल्याने जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ त्यावरून ये-जा करत आहेत. या साकवांची दुरुस्ती होणे, साकवांची पुनर्बाधणी करणे गरजेचे आहे. काही गावांमध्ये नवीन साकवांची आवश्यकता आहे.

दरवर्षी पावसाळ्यात या साकवांचा वापर भीतीदायक ठरत आहे. जून महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसात राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील लोखंडी साकव वाहून गेल्याची घटना घडली आहे. तसेच लांजा तालुक्यात कोलधे-कुंभारवाडी येथील लाकडी साकव मोडून पडला. या दुर्घटनांकडे गांभीर्याने पाहून नादुरुस्त साकवांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.

संपर्काचे एकमेव माध्यम
जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे, वाड्या, वस्त्यांमधील नदी, नाले, ओढ्यांवर बांधलेले साकव हाच एकमेव संपर्काचे माध्यम आहे. नादुरुस्त आणि धोकादायक असलेल्या साकवांमुळे अनेक वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे ये-जा करताना हाल होतात. जीव मुठीत धरून त्यांना प्रवास करावा लागतो. या साकवांसाठी शासनाने जास्तीत जास्त निधी मंजूर करून तो वेळीच देणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 09/Jul/2025