रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी मारुती मंदिरापासून विठ्ठलमंदिरापर्यंत जनजागृती सायबर दिंडी काढून नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेची जाणीव निर्माण केली.
सदर रॅली “सायबर सुरक्षित भारत” या संकल्पनेवर आधारित होती. विद्यार्थ्यांनी हातात फलक, घोषवाक्ये व पारंपरिक वेशभूषा परिधान करून रॅलीमध्ये सहभाग घेतला. रॅली दरम्यान त्यांनी सायबर फसवणूक, पासवर्ड सुरक्षाविषयक खबरदारी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फिशिंग ईमेलपासून सावधगिरी इत्यादी बाबतीत माहिती देणारे घोषवाक्ये दिली. दिंडीनंतर सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्यांनी भक्तिपूर्ण वातावरणात भजन सेवा सादर केली. पारंपरिक भजनांच्या माध्यमातून त्यांनी सायबर सुरक्षेचा संदेश भक्तांसमोर ठेवला. यानंतर मंदिरपरिसरात विद्यार्थ्यांनी “वॉर्निंग विठ्ठलाची” या विषयावर एक प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून त्यांनी सायबर गुन्हेगारीच्या विविध प्रकारांवर प्रकाश टाकत, त्यापासून बचावाचे उपाय नागरिकांना समजावले. सामान्य जनतेला आकर्षित करणाऱ्या या कलाकृतीने सायबर सुरक्षेविषयीची जाणीव प्रभावीपणे पोहोचवली.
विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत व डिजिटल युगातील सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत हा उपक्रम राबवला. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सायबर सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर जनजागृती करून विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी दाखवून दिली. सदर उपक्रम क्विक हिल फॉउंडेशन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्तविद्यमाने घेण्यात आला. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक व नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाने केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 09/Jul/2025














