रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकाभिमुख प्रशासनाकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नुकतीच ‘मिशन प्रगती’ आणि ‘मिशन प्रतिसाद’ या दोन महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा केली. यामुळे नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मिशन प्रगती : फिर्यादींना तपासाचे अपडेट्स मिळणार
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 193/३/2 नुसार, गुन्ह्यातील तपासाची माहिती फिर्यादीला मिळणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून रत्नागिरी पोलिसांनी ‘मिशन प्रगती’ सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्याच्या तपासाची प्रत्येक अपडेट (जसे की, घटनास्थळ पंचनामा, आरोपीला अटक किंवा नोटीस) मेसेज किंवा व्हॉट्सॲपद्वारे दिली जाईल. ज्यांच्याकडे मोबाईल नसेल, त्यांना पत्राद्वारे माहिती पाठवली जाईल. यामुळे पोलीस विभागाची पारदर्शकता वाढेल आणि फिर्यादींना त्यांच्या प्रकरणाची सद्यस्थिती कळू शकेल.
मिशन प्रतिसाद : ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास हेल्पलाइन
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘मिशन प्रतिसाद’ सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी स्थापन करण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष काही ठिकाणी निष्क्रिय झाल्याचे दिसून आले होते. हे काम मिशन मोडवर नेण्यासाठी हे नवे मिशन सुरू केले आहे. यासाठी दोन हेल्पलाइन नंबर (9684708316 आणि 8390929100) जाहीर करण्यात आले आहेत, जे 24 तास कार्यरत राहतील. ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार केल्यास, पोलीस अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत करतील. मदतीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत फोटो काढून तो पाठवणे बंधनकारक असेल, तसेच त्यांना मिळालेल्या मदतीवर आधारित एक फीडबॅक फॉर्म भरला जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास, पोलीस अधीक्षक स्वतः यावर लक्ष ठेवतील.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून वेगाने काम करण्यास सुरुवात केली असून, हे दोन नवे मिशन त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.













