लांजा : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवनदान

लांजा : भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीमधील खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास लांजा शहरातील लिंगायतवाडी येथे निदर्शनास आली.

सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असून अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राणी लोकवस्तीत शिरकाव करू लागले आहेत. गवा, माकडे, डुक्कर, सळीदंर, खवले मांजर, रानमांजर, घोरपड असे विविध प्राणी लोकवस्ती भागातील भात शेतीमध्ये नजरेस पडत आहेत. भक्ष्यासाठी याच लहान प्राण्यांचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये मंगळवारी लांजा शहरातील लिंगायतवाडी येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. शहरातील लिंगायतवाडी येथील राजेंद्र रामचंद्र लिंगायत यांच्या घराशेजारी मोठी विहिरी आहे. पाऊस पडत असल्याने सध्या ही विहीर पाण्याने भरलेली आहे.

मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान, घरातल्यांना विहिरीच्या दिशेने काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. मात्र, पाऊस सुरू असल्याने घरातील लोकांनी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर राजेंद्र लिंगायत यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ गेल्या. पाण्याचा पंप सुरू केल्यावर पाईपमधून पाणी गढूळ येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता विहिरीवर असणारे झाकण विस्कळीत होऊन विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना आढळले. त्यांनी लागलीच घरात जाऊन विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती घरातील माणसांना दिली. त्यानुसार या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, लांजा वनपाल सारीक फकीर, एम. जी. पाटील, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे सिद्धार्थ हिंगमेरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले.

बिबट्यासाठी बचावकार्य राबवताना वन विभागाने पिंजरा लावून स्थानिक नागरिकांच्या मदतीने सकाळी ९ वाजण्याच्य सुमारास दोन तासांच्या प्रयत्नांनर बिबट्याला सुखरुप विहिरीबाहेर काढले. हा बिबट्या नर जातीच असून तो अंदाजे चार वर्षाचा आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वन विभागाने सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 16/Oct/2024