रत्नागिरीत वैश्य भवन उभारणीला गती : जिल्ह्याभरातील मान्यवरांचा सल्लागार समितीत समावेश!

रत्नागिरी १० जुलै २०२५ : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरीच्या वैश्य भवन निर्माण समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक काल, बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी पार पडली. या बैठकीत वैश्य भवन उभारणीच्या कामाला गती देण्यासाठी आणि जिल्हाभरातून सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

जिल्ह्यातील विद्यार्थी आणि वैश्य समाज बांधवांना या वैश्य भवनाचा मोठा फायदा होणार असल्याने, वैश्य भवन समितीचा जिल्हाभरात समन्वय राहावा या हेतूने सल्लागार पदावर तीन प्रमुख व्यक्तींची निवड करण्यात आली. यात रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष विकास शेट्ये, लांजा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, आणि रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज युवकचे जिल्हाध्यक्ष श्रीनाथ खेडेकर यांचा समावेश आहे. वैश्य भवन निर्माण समितीचे अध्यक्ष सौरभ मलुष्टे यांनी या तिन्ही मान्यवरांच्या नावांची घोषणा केली. या तिघांचेही मोलाचे योगदान वैश्य भवन उभारणीच्या कामाला लाभणार आहे.

या बैठकीला वीरेंद्र वणजु, हेमंत वणजु, गणेश भिंगार्डे, सिद्धार्थ बेंडके, दिनेश जठार आणि सुनील बेंडखळे हे समिती सदस्य उपस्थित होते.

वैश्य भवन निर्माण करण्याचे काम आता प्रगतीपथावर असून, यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि नकाशे तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी उभारणीकरिता जिल्हाभरात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. समितीने सर्व समाज बांधवांना या वैश्य भवन उभारणीच्या कामात पुढाकार घेऊन आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.