रत्नागिरीतील सनसेट पॉईंटवरून उडी घेतलेल्या तरुणीचा अजूनही थांगपत्ता नाही; तटरक्षक दलाच्या मदतीची मागणी

रत्नागिरी, गुरुवार, १० जुलै २०२५ : रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय असलेल्या नाशिक येथील तरुणी सुखप्रित धालिवाल हिचा गेल्या दहा दिवसांपासून शोध लागलेला नाही. २९ जून रोजी ही घटना घडल्याचे पोलिसांत तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर पोलीस दलासह, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची टीम आणि एनडीआरएफकडून सातत्याने शोधमोहीम राबवण्यात येत असूनही सुखप्रितचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे बँकेत नोकरी करणारी सुखप्रित धालिवाल २९ जून रोजी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रत्नागिरीत आली होती. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तिने आपली चप्पल आणि स्कार्फ बाजूला ठेवून रत्नदुर्ग किल्ल्यावरील रेलिंगच्या पुढे जाऊन कठड्यावरून उडी मारली, असे तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच सुखप्रितचे नातेवाईक तात्काळ रत्नागिरीत दाखल झाले होते.

सुखप्रितच्या वडिलांनी या प्रकरणी तिच्या मित्रावर फसवणूक करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मित्राविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून पोलीस जवान, माऊंटेनिअर्सची टीम आणि एनडीआरएफ यांच्याकडून कसून शोध घेण्यात येत आहे. कालही रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या टीमने घटनास्थळी उतरून शोध घेतला, मात्र ती अपेक्षित ठिकाणीही आढळून आली नाही. या ठिकाणी शोध घेणे कठीण असल्याने पोलीस दलाने आता तटरक्षक दलाकडे हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे. मात्र, अद्याप ही मदत मिळालेली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सुखप्रित नाशिकला असताना तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यात तिने आपली व्यथा मांडली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

सुखप्रित बेपत्ता असल्याने या प्रकरणाच्या तपासात अडथळे निर्माण होत आहेत. तिच्या शोधासाठी आता तटरक्षक दलाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 10/Jul/2025