खळबळजनक! चिपळूणमधील कार व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा; तिघे अटकेत, पैशाच्या हव्यासापोटी खून

खेड, गुरुवार, १० जुलै २०२५ : चिपळूण तालुक्यातील सती येथील कार व्यावसायिक सुनील दादा हसे (वय ५४, मूळ रा. अंबड-अकोले, अहमदनगर) यांच्या खुनाचा पोलादपूर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी मोहन पांडुरंग सोनार (वय ५४, रा. बोरसूत-संगमेश्वर), अक्षय सचिन जाधव (वय २२, रा. बोरसूत-संगमेश्वर) आणि वंदना दादासाहेब पुणेकर (वय ३६, रा. लेन-जयसिंगपूर, कोल्हापूर) या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा खून केल्याची कबुली या तिघांनी पोलिसांना दिली आहे.

गुंगीचे औषध देऊन गळा आवळला, मृतदेह घाटात फेकला

२७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सुनील हसे यांना गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर त्यांच्याच कारमध्ये ओढणीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. खुनानंतर मृतदेह मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील कशेडी घाट रस्त्यालगत फेकून देत तिघेही पसार झाले होते. ३० एप्रिल रोजी पहाटे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह घाटात आढळला होता. भोगाव-पोलादपूरच्या पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

पोलिसांची ४ दिवसांत धडक कारवाई

या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांतच अक्षय जाधव याच्या मुसक्या आवळल्याने खून प्रकरणाचा छडा लागण्यास मदत झाली. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलादपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान असतानाच, तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर ओळख पटवत पोलिसांनी तपासाला गती दिली. अक्षय जाधव याच्याकडून पोलिसांच्या हाती धागेदोरे लागल्यानंतर मृतदेह फेकून पसार झालेल्या अन्य दोन संशयितांचा शोध सुरू होता. हे दोघे संशयित आपली ओळख लपवत कर्नाटक-सीमावर्ती भागात सलग दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर दोघांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले आणि खून प्रकरणाचा उलगडा झाला.

लिफ्ट देण्यावरून ओळख, पैशाच्या हव्यासापोटी कट

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील सती येथे वास्तव्यास असलेले सुनील हसे व्हॅगनार कार भाडेतत्त्वावर देऊन स्वतःही कार चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लिफ्ट देण्याच्या निमित्ताने त्यांची ओळख संशयित वंदना पुणेकर हिच्याशी झाली. यादरम्यान, संशयित महिलेला सुनील हसे हे श्रीमंत वाटले आणि तिने त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडे फारसे काहीही आढळून न आल्याने अखेर संशयित अक्षय जाधव याच्या मदतीने त्यांना संपवण्याचा कट रचला. यासाठी तिने मोहन सोनार याचीही मदत घेतली.

संशयित वंदना पुणेकर हिने सुनील हसे यांच्या कारमध्येच मागील आसनावर बसून २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना गुंगीचे औषध पाजले. कार कराड-चिपळूणमार्गे पोलादपूर दिशेने आणत असताना कारमध्येच ओढणीने गळा आवळून त्यांचा खून केला. यानंतर मृतदेह कशेडी घाटातील जुन्या महामार्गालगत काँक्रिटच्या संरक्षक कठड्यातून दरीत फेकल्याची कबुली संशयित महिलेने पोलिसांना दिली.

पोलादपूर पोलिसांचे कौतुक

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, महाड पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार तुषार सुतार, पोलीस नाईक अनुजित शिंदे, महिला पोलीस शिपाई बनसोडे यांचा पथकात समावेश होता. पोलादपूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

अटकेतील महिलेचा गुन्हेगारी इतिहास

कार व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या वंदना पुणेकर हिने यापूर्वीही पाच जणांशी घरोबा करत त्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात तिच्यावर दोन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. या महिलेचे आणखी कारनामे उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी तपासाला गती दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 10/Jul/2025