मुंबई : राज्यातील शाळांमध्ये ज्यांच्यावर ज्ञानदानाची जबाबदारी आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी तयार करायची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतरणापासून स्वीकारलेली आहे, त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ आणू नका, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आझाद मैदानात केले. नवी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर चिखलात बसण्याची वेळ येणे हे महाराष्ट्राला शोभणार नसल्याचे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
आझाद मैदानावर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवार यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. सरकारने त्यांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आझाद मैदानात येऊन आंदोलक शिक्षकांना आपला पाठिंबा दर्शविला. या वेळी खासदार नीलेश लंके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना पाठिंबा दर्शविला. या वेळी शरद पवार म्हणाले, “२४ ऑक्टोबरची जी ऑर्डर काढली त्यासाठी हजार बाराशे कोटी लागतील. त्याची तरतूद करा आणि पैसे द्यायला सुरुवात करा. राज्यामध्ये शिक्षकांचा सन्मानच होतो, असा इतिहास घडवा. महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद, देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थांमध्ये गेली ५६ वर्षे मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते, हे मला कुणी शिकवायची गरज नाही. मागणी पदरात पडेल यासाठी आमचा आग्रह राहणार आहे.”
विधानमंडळात आवाज उठवूः ठाकरे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिक्षकांना पाठिंबा दिला. “महाराष्ट्रात दिल्लीच्या गुलामांचे सरकार बसले आहे, ते आंदोलनाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या सरकारने तुमच्या मागण्यांना होकार दिला होता. हे सरकार फसवणूक करीत आहे. याबाबत विधानमंडळात आवाज उठवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 10/Jul/2025














