रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात पाऊस धो-धो कोसळत आहे. दुसरीकडे रत्नागिरी आगारासह इतर आगारातील जुन्या एस.टी. बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीच जुन्या एसटी बसेसची डागडुजी होणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेले नाही. सततच्या पावसामुळे एसटी बसेसमध्ये ठिबक सिंचन झाले आहे. त्यामुळे शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रत्नागिरी-लांजा, लांजा-रत्नागिरी व्हाया पावस, काजरघाटी यासह शहरातील सिटी बसेसची अवस्था बिकट आहे. यामुळे एसटी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विभागीय नियंत्रक साहेब, आगार व्यवस्थापक जुन्या एसटी बसेस दुरुस्तीकडे लक्ष देतील का, असा सवाल सर्वसामान्य प्रवासी विचारत आहेत.
रत्नागिरी आगारासह इतर आगारात थोड्या फार नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. त्याही लांब पल्ल्याच्या अंतरावर धावत असतात. मात्र जिल्ह्यांतर्गत प्रवास, शहरातील वाहतुकीसाठी जुन्या बसेसचा वापर होत आहे. यातील काही बसेस गल्या आहेत, तर काही बसेसची अक्षरशः वाट लागली आहे. पत्रे निघाले आहेत, सीट खराब झाल्या आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, पावसाळ्यापूर्वीच एसटी बसेसची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र ती न करता आहे त्याच स्थितीत बसेस धावत आहेत. त्यामुळे सततच्या गळणाऱ्या एसटी बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकतर एसटीची भाडेवाढ केली. याचा फटका प्रवाशांना बसत आहे, तर दुसरीकडे एसटी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे एसटी बसेस चांगल्या स्थितीतील द्याव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सिटी बसेसची अवस्था दयनीय शहरातील सिटी बसेसची अवस्था तर अधिक वाईट आहे. बोटावर मोजणे इतके बसेस चांगल्या आहेत. उर्वरित बसेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा गंजक्या, गळक्या एसटी बसेसमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.
विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष
लांजा, पावस, काजरघाटी, झर्ये यासह शहरातही एसटी बसेसने प्रवास करतो. मात्र रत्नागिरी आगाराच्या एसटी बसेसची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक लक्ष देत नाहीत, असे प्रवासी इरफान शेख यांनी सांगितले.
‘या’ मार्गावर बसेस सर्रास खराबच
पावस, काजीरघाटी मार्गे रत्नागिरी जाणाऱ्या बसेसची अवस्था बिकट झाली आहे. त्या खराब, गंजक्या बसेस आहेत, कित्येक ठिकाणी पत्रे निघाले असून बसताना प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात प्रवाशांनी अॅडजस्ट केले; मात्र पावसाळ्यात गळक्या छताच्या एसटी बसेस सोडल्यामुळे छत गळून थेंब, थेंब पाणी सीटवर पडत आहे. काही सीट तुटलेल्या आहेत. काही ठिकाणी खिडकी लावूनही पाऊस एसटीमध्ये येत आहे. रत्नागिरीसह ९ डेपोंनी चांगल्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
एसटी वाहक एक रुपयासाठी उद्धट बोलतात
एसटी महामंडळाने तिकीट दरात वाढ केल्यामुळे चिल्लरचा वांदा झाला आहे. एक रुपयासाठी जिल्हांतर्गत व लांब पल्ल्याच्या एसटीचे काही वाहक आणि प्रवाशांत दररोज वाद, किरकोळ बाचाबाची, भांडणे होत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक साहेबांनी अशा उध्दट वाहकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विभागीय नियंत्रक बोरसे साहेब अशा उद्धट बोलणाऱ्या एसटी चालकांना समज द्या किंवा कारवाई करा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:40 PM 10/Jul/2025














