रत्नागिरी, गुरुवार, १० जुलै २०२५ : रत्नागिरी शहरातील एका मुख्य रस्त्यावरून भरदिवसा चारचाकी गाडी चोरीला गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बशीर मुसा काझी (वय ५८, रा. प्लॉट नं. के १३, एमआयडीसी, झाडगाव, रत्नागिरी) यांची झुंडाई एक्सेंट गाडी (क्र. एम.एच.०८/एजी/२१६६) साळवी स्टॉप येथील आरोग्य मंदिर परिसरातून चोरीला गेली असून, त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणाहून गाडी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२५ रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास बशीर काझी आपली झुंडाई एक्सेंट गाडी घेऊन घरगुती कामासाठी साळवी स्टॉपकडे निघाले होते. मिल्लतनगरमार्गे आरोग्य मंदिर येथे आल्यानंतर रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर ते साळवी स्टॉप जाणारे रोडवर, लॉरेन्स अँड मेयो दुकानासमोर, पानवलकर कॉलनी, आरोग्य मंदिर येथे त्यांनी आपली गाडी लावली. गडबडीमध्ये त्यांनी गाडीची चावी गाडीतच ठेवली आणि रस्त्याच्या पलीकडील दत्त मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी गेले.
औषधे घेऊन परत आल्यानंतर त्यांना आपली गाडी जागेवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता गाडी मिळून आली नाही. गाडीची कागदपत्रेही गाडीच्या डॅशबोर्डमध्येच होती, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यावरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली आहे.
चोरीस गेलेल्या गाडीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:
गाडीचा प्रकार: झुंडाई एक्सेंट (Hyundai Xcent), रंग: सफेद, क्रमांक: एम.एच.०८/एजी/२१६६, अंदाजित किंमत: १,५०,०००/- रुपये
रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरूनच अशा प्रकारे गाडी चोरीला जाण्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 10/Jul/2025














