खेड बाजारपेठेत वाहतूक कोंडी करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

खेड : खेड बाजारपेठेतील चिंतामणी लॉंड्रीसमोर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने गाडी उभी केल्याप्रकरणी एका वाहनचालकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल, बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई तेजस्वीनी उमेश जाधव (बकल नंबर ५५८, नेमणूक खेड पोलीस ठाणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुरज मधु सोनावले (वय ३५, रा. बौद्धवाडी, मुंबके, ता. खेड) याने आपली मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी गाडी (क्र. एम.एच. ४६ सी.एल. २००३) खेड बाजारपेठेतील गांधी चौकाजवळील चिंतामणी लॉंड्रीसमोर अशा पद्धतीने उभी केली होती, ज्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता.

याप्रकरणी खेड पोलिसांनी काल दुपारी १.५० वाजता गु.र.नं. २१९/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बाजारपेठेतील वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या असून, अशा प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 10/Jul/2025