दापोलीत गुरांच्या वादातून कोयत्याने हल्ला; एकाचा दात पडला

दापोली : दापोली तालुक्यातील मुर्डी येथे गुरांच्या वादातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल, बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एकनाथ जगन्नाथ राऊत (वय ३९, रा. मुर्डी तेलेवाडी, दापोली) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचा एक दात पडला आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणी विश्वास रामचंद्र महाडिक (रा. आंजले कातळकोंड, दापोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ राऊत हे मुर्डी येथील नवखंडा शेतात आपली गुरे चरवत होते. त्यावेळी त्यांनी गुरे हाकलण्यासाठी हातात असलेली काठी हलवली. याच गोष्टीचा गैरसमज करून घेत आरोपी विश्वास महाडिक याने एकनाथ राऊत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, विश्वास महाडिकने राऊत यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात एकनाथ राऊत यांच्या डाव्या हाताचे मनगट, डोके आणि हनुवटीला दुखापत झाली असून, त्यांचा एक दातही पडला आहे. घटनेनंतर जखमी राऊत यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दापोली पोलिसांनी या प्रकरणी काल रात्री ७.४२ वाजता गु.र.नं. १३१/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास सुरू आहे. गुरांच्या क्षुल्लक वादातून थेट कोयत्याने हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 10/Jul/2025