चिपळूण : वाशिष्ठी डेअरीकडून शेतकऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

चिपळूण : कोकणात प्रथमच यशस्वी ठरलेल्या वाशिष्ठी डेअरीकडून शेतकऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. अध्यक्ष प्रशांत यादव यांनी ७ हजार ५०० शेतकऱ्यांसाठी ४५ लाख रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. साडेसात हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी बोनस रक्कम जमा केली जाणार आहे. शेतीपूरक दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे उद्योजक प्रशांत यादव यांनी सांगितले.

कोकणातला पहिला दुग्ध प्रकल्प असलेला वाशिष्ठी डेअरी प्रकल्प दोन वर्षांपूर्वी पिंपळी येथे सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही झाली आहे. या डेअरीचे पदार्थ कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रातही जातात. डेअरीचे पदार्थ मुंबईत विक्री होतील, असे अध्यक्ष यादव यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाचे मालघर, आंबडस, पिंपळी, खेरशेत, दस्तुरी, वेरळ, साडवली, दापोली, वानोशी करबुडे, महाड, शृंगारतळी, आंबडस या ठिकाणी दूध शीतकरण केंद्र सुरू असून, या केंद्राच्या पंचक्रोशीतील शेतकरी या केंद्रावर दूध देत आहेत. शेतकऱ्यांना दुधाचे बिल दर १० दिवसांनी अखंडितपणे अदा केले जात असल्याने शेतकरी समाधानी आहेत. या वाशिष्ठी डेअरीच्या एकूण ५२ दूध संकलन केंद्रावर ९ हजार २८५ शेतकऱ्यांकडून दररोज ४६ हजार लिटर दूध संकलित होत आहे.

दूध संकलित करताना शेतकऱ्यांकडून सुरक्षा ठेव घेतली जाते. ही रक्कम दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना अदा केली गेली जात आहे तसेच विशेष म्हणजे २०२३ ते मार्च २०२४ वर्षातील १२ महिन्यांच्या कालावधीत दूध संकलित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक बिलाच्या रक्कमेवर बोनस जाहीर केला असून, हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 16/Oct/2024