चिपळूण : भाजी मंडईसह मच्छी मार्केटच्या लोकार्पणात अडथळे

चिपळूण : शहरातील भाजी मंडईसह मच्छी-मटण मार्केट इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल चिपळूण नगर परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार या दोन्ही इमारतींचे बांधकाम १५ वर्षे जुने झाल्याने किरकोळ दुरुस्तीसह मजबुतीकरणाची आवश्यकता असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही इमारतींच्या लोकार्पणात अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

चिपळूण परिषदेने १५ वर्षांपूर्वी मच्छी-मटण मार्केट व भाजी मंडईच्या इमारती पाडून नवीन बांधल्या; राजकारणामुळे मात्र इमारती आजतागायत सर्व सोयी-सुविधांयुक्त पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगर परिषदेचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता या प्रकल्पांचा लिलाव करण्याचे ठरवले आहे

त्यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीकडून भाजी मंडईतील ६२ गाळे, २१ ओटे, मच्छी-मटण मार्केटमधील ४३ गाळे, पवन तलाव मैदान परिसरातील इमारतीतील ७ गाळे व गोवळकोट धक्का येथील कॅन्टीनचे फेरमूल्यांकन करून घेतले आहे. तसेच ना परतावा अनामत रक्कम, भाडेही कमी करून घेतले आहे. त्यानंतर व्यावसायिकांच्या बैठका घेतल्या. त्यात स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासह दुरुस्ती करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती.

सांगली महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. त्याचा अहवाल आता प्राप्त झाला असून दोन्ही प्रकल्पाच्या इमारतीत काही दुरुस्ती व मजबुतीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार लवकरच मटण-मच्छी मार्केटच्या किरकोळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. ही दुरुस्ती पूर्ण होताच लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या दोन्ही इमारतीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाबाबत केलेल्या सूचना व उपाययोजनांची पूर्तता करणे आवश्यक आहे, परंतु ते आर्थिकदृष्ट्या नगर परिषदेला परवडणारे नाही. त्याशिवाय विविध घटकांवर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट (एनडीटी) करणे आवश्यक आहे. – इनायत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 10/Jul/2025