हातखंबा, दि. १० जुलै : गेली ३५ वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या योगायोग मित्र मंडळ, हातखंबा यांच्या वतीने यंदाही मोठ्या उत्साहात गुरु पौर्णिमा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ २०२५ पार पडला. हा कार्यक्रम मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची आणि शैक्षणिक कार्याची परंपरा पुढे नेणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात हातखंबा पंचक्रोशीतील निवृत्त शिक्षकांच्या आणि सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सत्काराने झाली. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मंडळाने या गुरुजनांचा यथोचित सन्मान केला. यानंतर, कै. अरविंद (आबा) कोळवणकर यांच्या स्मरणार्थ, श्री. ओमकार कोळवणकर यांच्या हस्ते गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर आणि श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर जुनियर कॉलेजमधील दहावी व बारावीच्या प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला डी. कॅड कॉलेज देवरुखचे प्राध्यापक श्री. परांजपे सर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावली. परांजपे सरांनी लाईव्ह पोर्ट्रेट स्केच डेमो सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि आपल्या कलेचे प्रदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाबासाहेब धोंगडे, मंडळाचे मार्गदर्शक प्राध्यापक श्री. चंद्रमोहन देसाई सर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती अंजली शिंदे मॅडम, उपसरपंच श्री. सुनील डांगे आणि निवृत्त ज्येष्ठ शिक्षक यांसारखे अनेक मान्यवर पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
गुरु पौर्णिमेच्या शुभदिनी, सामाजिक कार्यकर्ते श्री. निरंजन जठार आणि योगायोग मित्र मंडळ, हातखंबा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच जि. प. शाळा हातखंबा क्र. १, हातखंबा अंगणवाडी, जि. प. शाळा तारवेवाडी आणि जि. प. शाळा बोंबलेवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम योगायोग मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. योगेश मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडला. मंडळाचे उपाध्यक्ष संदीप गुरव, ओंकार कोळवणकर, विकास तारवे, श्रीकांत बोंबले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आदेश डांगे यांनी केले, तर सचिव श्री. सचिन सावेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 10-07-2025














