देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात अॅनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

देवरूख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात एन.एस.एस. विभाग व स्वयंपूर्तता फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातमधील श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, धरमपूर यांच्यातर्फे कोकणातील ग्रामपंचायती व शैक्षणिक संकुले यांमधील कर्मचारी व विद्यार्थी यांच्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्याकरिता स्वयंपूर्तता फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. शिबिरामध्ये आठल्ये-सप्प्रे- पित्रे महाविद्यालयातील ३१२ विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

शिबिराचे औपचारिक उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी मानवी रक्तातील योग्य हिमग्लोबिनचे प्रमाण, हिमग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम याबाबत आढावा घेऊन, कोकणातील बहुसंख्य व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या हिमोग्लोबिन पातळी खालावण्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्वयंपूर्तता फाउंडेशनकडून दीपिका रांबाडे व त्यांचे सहकारी, एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा मयुरेश राणे, प्रा. स्वप्राली झेपले उपस्थित होते. यावेळी हिमोग्लोबिन पातळी कमी आढळलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक औषधे देण्यात आली. तसेच जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक हेमंत कदम, महेंद्र मेचकर आणि अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 10/Jul/2025