रत्नागिरी : रत्नागिरी शहरात लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण होणार आहे. सुमारे ३० ते ३२ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या नवीन कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव बनवला आहे. त्याचबरोबर जे जुने कॅमेरे आहेत त्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही तरतूद करण्यात आली आहे. नवीन कॅमेरे बसवण्याचे ठिकाण नगर परिषद आणि पोलिसांच्या समन्वयाने निश्चित केले जाणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे सामाजिक स्वास्थ सुदृढ ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. गुन्हेगारांनी केलेल्या कृत्यांना या कॅमेरामधील चित्रीकरण वाचा फोडते. त्याचबरोबर रत्नागिरी शहरात ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कार्य करणाऱ्या महापुरुषांचे, मावळ्यांचे पुतळे आणि वास्तू पर्यटनाला चालना देत आहेत. अशा ठिकाणी नवीन सी.सी.टी.व्ही. बसवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
रत्नागिरी शहरात सध्या २२ कॅमेरे असून त्यात आणखी ३० ते ३२ नवीन कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या विद्युत विभागाने या नवीन कॅमेरांसह जुन्या कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव बनवला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात येणार आहे. प्रस्तावाच्या मंजुरीनंतर निधी उपलब्धतेनुसार नवीन कॅमेरे बसवले जाणार आहेत.
रत्नागिरी नगर परिषद आणि पोलिस समन्वयाने नवीन कॅमेरे बसवण्याची ठिकाणे निश्चित करणार आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण करणारी स्क्रिन पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे अभियंता वानखेडे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 11/Jul/2025














