जालगाव : दापोली तालुक्यातील दाभोळ परिसरात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणार्या शिक्षकाविरोधात दाभोळ सागरी पोलिस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराधपासून संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दापोली न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्याला निलंबित केल्याचे जाहीर केले आहे.
दाभोळ परिसरातील एका प्राथमिक शाळेतून पीडित दहा वर्षीय बालिका आपल्या घरी चालत जात असताना संशयित किशोर काशीराम येलवे (रा. आगरवायनगणी, ता. दापोली) हा 7 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4.30 वा. च्या सुमारास आपल्या दुचाकीवर बसून पीडित मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. ही बालिका घरात एकटीच असल्याचे व ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेत ही मुलगी घरात कपडे बदलण्यासाठी गेली असता संशयित तिच्या पाठीमागे जाऊन त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले तसेच कोणाला सांगितलेस तर बघ, अशी धमकी दिली होती आणि तो तिथून निघून गेला होता.
या पीडित बालिकेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आजीला सांगितला. पीडित बालिकेच्या आजीने तत्काळ दाभोळ सागरी पोलिस ठाणे गाठून संशयिताविरोधात तक्रार दाखल केली होती. दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, संशयित हा दाबोड येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने रत्नागिरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे हे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 11-07-2025














