पावस : तालुक्यातील गणेशगुळे किनाऱ्यावर गस्त घालत असताना प्रत्येकी २० किलो वजनाची दोन कासवे जाळ्यामध्ये अडकल्याचे पोलिस पाटील संतोष लाड यांनी पाहिले. त्यांनी मित्रांच्या सहकार्याने या दोन कासवांची जाळ्यामधून सुटका करून त्यांना पुन्हा समुद्रामध्ये सोडले.
गुरुवारी (ता. १०) सकाळी नऊच्या सुमारास संतोष लाड समुद्रकिनारी गस्त घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी किनारी भागांमध्ये दोन कासवे जाळ्यात अडकल्याचे लक्षात आले. त्यांनी संजय तोडणकर, विजय तोडणकर व शेखर तोडणकर यांना याची माहिती दिल्यानंतर तातडीने हे तिघेजण लाड यांच्या मदतीला धावले.
या चौघांनी मिळून माशाची जाळी कापून त्या दोन कासवांना सोडवले. त्यानंतर दोन कासवांना समुद्रात सोडण्यात आले. या दोन्ही कासवांचे वजन प्रत्येकी २० किलो होते. याबाबत लाड म्हणाले, या किनाऱ्यावर गेले तीन वर्षे कासव संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे अधूनमधून या किनाऱ्यावरती कासवे फिरत असतात. आठ दिवसापूर्वी या किनाऱ्यावर जाळीत अडकलेले कासव सोडवून समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारे या परिसरात कासव संवर्धनाचे काम केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 11/Jul/2025














