खेड-भरणे मार्गाच्या डागडुजीसाठी नगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट

खेड : खेड-भरणे मार्गाची चाळण झाली आहे. राज्यमार्गाच्या दर्जामुळे डागडुजीत अडसर निर्माण झाल्याने जागोजागी पडलेल्या खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. डागडुजीसाठी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवत आहे.

खेड-भरणे मार्गावर खड्ड्यांचे विघ्न वर्षानुवर्षे वाहनचालकांच्या पाचवीला पुजले आहे. सततची रहदारी असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक, तीनबत्तीनाका, शिवाजीनगर, महाडनाका येथील खड्डे डोकेदुखी ठरत आहेत. खेड ते भरणे या २ किमी अंतरावरील १० मिनिटाच्या प्रवासासाठी २० ते २५ मिनिटे मोजावी लागतात. यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. भरणे-खेड-दापोली मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दापोलीपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील भरणे-खेड मार्ग राज्यमार्गामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित गेला आहे. यामुळे मार्गाची डागडुजी करण्यास पालिकेला मर्यादा आल्या आहेत. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने अजूनही याकडे लक्ष दिलेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 11/Jul/2025