चिपळूण : पालिकेच्या जलतरण तलावातील गैरसुविधांवर शुक्रवारपासून (ता. ११) उपाययोजना केली जाणार आहे. भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालिकेने उपायोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस आशिष खातू यांनी दिली.
रामतीर्थ तलाव परिसरात पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जलतरण तलाव उभे केले. या तलावाला शहर आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. मे महिन्यात शेकडो लोक इथे पोहण्यासाठी येत होते. या तलावाला पाणीपुरवठा करणारी पालिकेची वाहिनी दोन महिन्यांपासून फुटलेली आहे. त्यामुळे जलतरण तलावातील शौचालय आणि बाथरूममध्ये पाणीच येत नाही. या संदर्भात ठेकेदाराने पालिकेशी वारंवार संपर्क साधला, पत्रव्यवहार केला त्यानंतरही पालिकेने लक्ष दिले नाही म्हणून काही ग्रामस्थांनी या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या मांडली. त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने काल जलतरण तलावाची पाहणी केली आणि स्थिती पडताळून पाहिली.
जलतरण तलावाची दुरवस्था पाहून भाजप कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि जलतरण तलावातील गैरसुविधा तत्काळ दुरुस्त करण्याची सूचना केली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पाणीविभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि ठेकेदाराशी संपर्क साधून उद्यापासून दुरुस्ती सुरू करण्याचे आश्वासन दिले. या वेळी शहराध्यक्ष शशिकांत मोदी, आशिष खातू, रसिका देवळेकर, वैशाली निमकर, सारिका भावे, शीतल रानडे, विनायक वरवडेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 11/Jul/2025














