रत्नागिरी : गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली; मात्र शिवभोजन थाळी केंद्रांना घरघर लागल्याची परिस्थिती आहे.
जिल्ह्यातील २६ केंद्रांपैकी १४ बंद पडली असून, आता फक्त १२ केंद्रे सुरू आहेत. लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला असून, त्याचा फटका शिवभोजन बाळीला बसू लागला आहे. गेल्या ४ महिन्यांचे अनुदान प्राप्त न झाल्यामुळे केंद्रचालक आर्थिक अडचणीत आहेत. दर दिवशी सरासरी १ हजार ४८० लाभार्थी या बाळीचा लाभ घेत असल्याची नोंद जिल्हा पुरवठा विभागात आहे. या योजनेतर्गत २६ लाख २५ हजार अनुदान प्राप्त आहे.
शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. यात दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते. कोरोनाकाळात तत्कालीन शासनाकडून ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ही थाळी दहा रुपयांत देण्यात येते. यासाठी केंद्रचालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते; मात्र हे अनुदान महागाईमुळे आता अपुरे पडत आहे. जिल्ह्यातील २६ शिवभोजन केंद्रे मंजूर आहेत. त्यांना ३०५० चाळया मंजूर आहेत: परंतु या केंद्रांपैकी १२ केंद्रेच सुरू आहेत. १२ केंद्रांवर १० रुपयांत जेवण दिले जाते. मजुरांची उपासमार टाळावी यासाठी शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. यामध्ये भात, चपाती, आमटी, भाजीचा समावेश आहे. या केंद्रचालकांना प्रत्येक थाळीमागे लाभार्थींचे १० रुपये आणि शासनाकडून ४० रुपयांचे अनुदान मिळते; परंतु शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्याचा मोठा आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडत आहे. तो कमी करण्यासाठी कोरोनापासून सुरू असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडल्यामुळे मार्च ते जूनपर्यंतची देयके रखडली होती.
त्यामुळे केंद्रचालक अडचणीत आले आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने पाठपुरावा केल्यामुळे १२ केंद्रांचे २६ लाख २५ हजार एवढे अनुदान ४ जुलैला प्राप्त झाले आहे. त्यामुळे मार्च, एप्रिलची केंद्रांची देयके लवकरच दिली जाणार आहेत. उर्वरित देयकेदेखील लवकरच देऊ, असे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले.
गरजूंना पोटभर अन्न देणारी ही शिवभोजन थाळी योजना आहे: गरजूंना आम्ही पोटभर जेवण देतो. शासनाने वेळेवर त्याचे अनुदान द्यावे. काही निर्बंध घालून दिले तरी चालतील; परंतु ही योजना बंद करू नये. शासनाला खूप आशीर्वाद देऊन जाणारी ही योजना आहे- गणेश धुरी, शिवभोजन केंद्रचालक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 11/Jul/2025














