रत्नागिरी : सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सूर्यघर योजनेबाबत सोमवारी मार्गदर्शन

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती देण्यासाठी रत्नागिरीत सोमवारी १४ जुलै रोजी मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या तालुक्यांमधील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी जागा उपलब्ध असेल, अशा प्राधान्याने निवड केली जाणार आहे.

या योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभेत रत्नागिरी जिल्हा सहकारी हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, महावितरणचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजता ही सभा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जयस्तंभ (रत्नागिरी) येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. सभेला रत्नागिरी तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून माहिती घ्यावी, असे आवाहन सहायक निबंधक (सहकारी संस्था) साहेबराव पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 11-07-2025