मुंबई : सरळसेवा भरती परीक्षा तीन महिन्यांच्या आत एमपीएससीमार्फत घ्याव्यात, तसेच या परीक्षांचे शुल्कही कमी करून सरसकट ५०० रुपये करावे, अशा मागण्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.
राज्यातील बेरोजगारांची परिस्थिती अत्यंत बिकट असून कमावण्याचे साधन नसल्याने अनेक उमेदवार मोलमजुरी करून परीक्षांसाठी हजार-हजार रुपये जमा करून अर्ज भरत असतात. त्यामुळे सरळसेवा परीक्षेच्या अर्जाचे शुल्क कमी करून ते सरसकट ५०० रुपये इतके करावे, कंपन्यांना अधिकचे पैसे द्यावयाचे झाल्यास शासनाने बेरोजगारांसाठी सबसिडीची व्यवस्था करावी. इतके शुल्क भरूनही सदर कंपन्यांनी घेतलेल्या बहुतांश परीक्षांचं पेपर फुटले आहेत किंवा त्या पदभरतीमध्ये घोटाळा झाला आहे. सदर संस्थांचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी घोटाळ्यात सामील आहेत आणि त्यातील काहींवर गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत. जास्त परीक्षा शुल्क भरूनसुद्धा सदर कंपन्या आपले काम चोखपणे बजावू शकलेल्या नाहीत म्हणून सदर संस्थांकडून पदभरतीचे काम काढून घेण्यात यावे आणि तीन महिन्यांच्या आत सर्व गट-क सरळसेवा परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात, असे पत्रात म्हटले आहे.
गट-क आणि गट-ड संवर्गातील नोकर भरतीसाठी सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांची २१ नोव्हेंबर २०२२ रोजी निवड केली होती. मागील तीन वर्षात या संस्थांनी अनेक पदभरती परीक्षा घेतल्या. पण, शासनाने ठरवल्याप्रमाणे ५०० ते ७०० शुल्क न आकारता विद्यार्थ्यांकडून सरसकट ९०० ते १००० रुपये प्रतिअर्ज इतके जादा शुल्क आकारले जात असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 11/Jul/2025














