रत्नागिरी: सुनेकडून सासरच्या घरात ३.६२ लाखांची फसवणूक; सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पाली, मोहितेवाडी येथे एका सुनेने आपल्या सासरच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १०/०७/२०२५ रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दत्ताराम राजाराम मोहिते (वय ५९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. मोहितेवाडी पाली, ता.जि. रत्नागिरी) यांच्या राहत्या घरी घडली. फिर्यादींच्या मुलाशी लग्न झालेली त्यांची सून, हिने २८/०६/२०२५ रोजी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, १०/०७/२०२५ रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास तिने फिर्यादींच्या बेडरूममधील लोखंडी कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या कुलूपबंद पेटीतील कुलूप काढून, त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि ६०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकूण ३,६२,०००/- रुपयांचा ऐवज विश्वासघात करून घेऊन गेली.

या घटनेची तक्रार दत्ताराम राजाराम मोहिते यांनी १०/०७/२०२५ रोजी रात्री २३.४९ वाजता पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. १३७/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२) प्रमाणे एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 11-07-2025