इंग्रजी वाचन, गणिती कौशल्यांचा ‘मेस्त्री पॅटर्न’ राबवा : सुहास खंडागळे

साडवली : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि गणिती कौशल्ये सुधारण्यासाठी कृष्णा मेस्त्री या शिक्षकाने सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन तो जिल्हाभरातील सर्व मराठी शाळांमध्ये लागू करावा, अशी मागणी गावविकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

खंडागळे यांनी आपल्या निवेदनात मेस्त्री यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे, मेस्त्री हे गेल्या अनेक वर्षांपासून शालेय अभ्यासक्रमाबाहेर जाऊन मुलांसाठी स्वतंत्र इंग्रजी वाचन आणि गणिती क्रिया उपक्रम राबवत आहेत. ते शिकवत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनाही उत्तम इंग्रजी वाचता येते. या उपक्रमामुळे मुलांना इंग्रजी वाचन आणि गणिती ज्ञान सहजतेने आत्मसात करता येते. मेस्त्री यांनी वायंगणे आणि किरडुवे येथील शाळांमध्येही हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. सध्या ते देवरूख येथील छत्रपती शिवाजी महाराज शाळेत कार्यरत असून, त्यांच्या वर्गातील मुलींचे इंग्रजी वाचन पाहून मराठी शाळांचे भविष्य अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्येच आहे. त्यामुळे असे उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन द्या, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे. मेस्त्री यांनी शाळेत राबवलेला इंग्रजी वाचन आणि गणिती क्रिया उपक्रम प्रत्यक्ष सीईओंनी जाऊन पाहावा, अशी विनंती खंडागळे यांनी केली आहे.

स्वतंत्र पुस्तकांची निर्मिती
मेस्त्री यांनी इंग्रजी वाचन आणि गणिती क्रियांसाठी स्वतः पहिली ते सातवीसाठी स्वतंत्र पुस्तके तयार केली आहेत, जी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. ही पुस्तके नियमित अभ्यासक्रमावर आधारित असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक स्पष्टपणे समजावून सांगतात. त्यामुळे इंग्रजी वाचनाचा कंटाळा करणारी लहान मुलेही आवडीने आणि आत्मविश्वासाने कोणत्याही इयत्तेचे पुस्तक सहज वाचताना दिसतात. त्यांचे उच्चारही व्यवस्थित असतात.

शाळा व्यवस्थापन समित्यांनी त्यांच्या शाळांमध्ये राबवले जाणारे यशस्वी उपक्रम शिक्षण विभागाकडे सादर करावेत जेणेकरून ते इतर शाळांमध्येही राबवता येतील. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढल्यास एकंदरीत सार्वजनिक शिक्षणव्यवस्था मजबूत होईल- सुहास खंडागळे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 11/Jul/2025