रत्नागिरी : रत्नागिरी येथील मराठा मंदिर, विद्या वर्धिनी स.रा. देसाई डी.एल.एड कॉलेजमध्ये गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा आणि डी.एल.एड अभ्यासक्रमाला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नवागतांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि महर्षी व्यास ऋषी व सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले होते, जे कौतुकास्पद ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता शेट्ये या विद्यार्थिनीने केले.
गुरुपौर्णिमा या पवित्र विषयावर साक्षी मांडवकर आणि पूजा धुमक या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी गुरु-शिष्याचे नाते किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. त्याचबरोबर, डी.एल.एड. प्रथम वर्षासाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी आपला परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. साक्षी मांडवकर आणि पूजा धुमक या नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही आपला स्वतःचा परिचय करून दिला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व प्राध्यापकांना गुरुदक्षिणा म्हणून एक गुलाबाचे रोपटे आणि भेटकार्ड देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर, कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे यांनी आपल्या अमोघ वाणीने गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले. त्यांनी भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्याचे नाते किती पवित्र आहे, हे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी कर्माचा सिद्धांत यावर भाष्य करताना महाभारत आणि रामायण यांमधील अनेक उदाहरणे आणि दाखले दिले. माणसाने आपले कर्म कसे चांगले ठेवावे, माणूस म्हणून कसे जगावे आणि माणसाने माणसाशी कसे वागावे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, आभार प्रदर्शनाचे काम शब्दश्री कांबळे हिने केले. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता त्यानंतर झाली. या कार्यक्रमाला कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडले, ज्यामुळे त्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रमाचे आयोजन कसे करावे, याचे एक उत्तम उदाहरण घालून दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 11-07-2025














