खेड : शेणावरून झालेल्या वादातून महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी, खेड, गुरुवार, १० जुलै २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात तिसंगी येथे शेणाच्या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास तिसंगी-खेड रस्त्यावर घडली. फिर्यादी सुषमा संतोष मोहिते (वय ५१ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. तिसंगी जांभुळवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्या पतीने, संतोष सीताराम मोहिते, यांनी त्यांच्या सलूनच्या दुकानासमोरून मोठ्याने आवाज येत असल्याने तिथे जाऊन पाहिले. त्यावेळी आरोपी तुकाराम रामचंद्र खामकर (रा. तिसंगी जांभुळवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा आपली गुरे चारून परत घरी घेऊन जात होता.

जनावरांचे शेण रस्त्यावर पडले होते आणि ते शेण एका चारचाकी वाहनामुळे सलूनच्या दुकानावर उडले. यामुळे फिर्यादींचे पती संतोष मोहिते यांनी आरोपी तुकाराम खामकर याला शेण बाजूला करण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने संतोष मोहिते यांना त्याच्या हातातील काठीने मारहाण केली आणि शिवीगाळ करत “तुला काय करायचे ते कर” असे बोलला.

यावेळी फिर्यादी सुषमा मोहिते आरोपीला विरोध करण्यासाठी गेल्या असता, आरोपीने त्यांच्या हातावरही काठीने मारहाण केली. या मारहाणीत सुषमा मोहिते यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर सुषमा संतोष मोहिते यांनी १०/०७/२०२५ रोजी रात्री २१.३९ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खेड पोलिसांनी गुन्हा रजि. नं. २२१/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे तुकाराम रामचंद्र खामकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 11-07-2025