रत्नागिरी, गुरुवार, १० जुलै २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पिंपळी येथील कुंभारवाडी स्टॉप, निसर्ग हॉटेलजवळ गुरुवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा इंट्रा गाडीने समोरून येणाऱ्या स्कुटीला धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सायली संतोष नलावडे (वय २६ वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा. शिरगाव नवीन वसाहत, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांचे पती संतोष गणपत नलावडे (वय २७ वर्षे) हे त्यांची टी.व्ही.एस एनटॉर्क स्कुटी (एमएच ०८ एयु ४७२०) शिरगाव येथून खेर्डीकडे कराड-चिपळूण रोडने चालवत घेऊन जात होते. त्याचवेळी आरोपी राजेश दत्ताराम (रा. कोडफणसवणे, ता. चिपळूण) हा त्याच्या ताब्यातील टाटा इंट्रा गाडी क्रमांक (एमएच ०८ ए.पी ४५९३) चिपळूणकडून पवार कराड रोडने चालवत घेऊन येत होता.
रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, आरोपीने आपली गाडी अविचारीपणे आणि हयगयीने भरधाव वेगाने चालवली. समोरून एका मोटारसायकलला ओव्हरटेक करत असताना, त्याने फिर्यादींच्या अंगावर येऊन त्यांच्या टी.व्ही.एस एनटॉर्क स्कुटीला समोरून जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे सायली नलावडे यांच्या हाताला आणि उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले असून, त्यांचे पती संतोष नलावडे यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर टाटा इंट्रा गाडी क्रमांक एमएच ०८ ए.पी ४५९३ हा टेम्पो पुढे जाऊन पलटी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर सायली संतोष नलावडे यांनी १०/०७/२०२५ रोजी रात्री २१.५७ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चिपळूण पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ४८/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे राजेश दत्ताराम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला बीएनएसएस ३५ (३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 11-07-2025














