मंडणगड विकास आराखडा नियोजनात नागरिकांचा सहभाग महत्वाचा

मंडणगड : मंडणगड शहराचा विकास आराखड्याकरिता पीएलयू प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती व केलेल्या सूचनांचा आराखड्यात गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे. शहराच्या अस्तित्वातील रचनेचा (एएलयू) विचार करून व नागरिक, प्रशासन, तज्ज्ञ यांच्या सहभागाने शहराचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे.

पीएलयूच्या नकाशानुसार प्रकर्षाने काही बाबींवर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. आराखड्याच्या नियोजनात शहरातील रस्त्यांची वाढलेली रुंदीमुळे शहरातील अनेक घरे, व्यावसायीक व शासकीय आस्थापने प्रभावित होत आहेत. अनेक ठिकाणच्या जागेच्या हिस्स्यांमध्ये विभागणी झाल्याने आरक्षणाची माहिती सर्व्हेनुसार नागरिकांना नीट अवगत होत नाहीत, याबाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने आराखड्यामधील नियोजनातील विशेषतः रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा नागरिकांच्या सूचनेनुसार निश्चित करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आरक्षणाची माहित सर्व्हे नंबरनुसार स्पष्टपणे जाहीर करावी, जागेच्या हिस्स्यांमुळे गोंधळ टाळण्यासाठी, प्रत्येक सर्व्हे नंबर आणि उपविभागांची (हिल्सा) माहिती नागरिकांना द्यावी, त्यामुळे कोणत्या जागेवर आरक्षण आहे, हे नागरिकांना सहज कळेल. नागरिकांनी केलेल्या सूचना व प्रभावित नागरिकांचे मत विचारत घेणे तितकेच गरजेचे आहे. त्यानुसार बदल करून समृद्ध विकास आराखड्याचे नियोजन करता येवू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन, नागरिक आणि तज्ज्ञ यांचा समन्वय साधने अत्यंत आवश्यक आहे.

शहर हे तालुक्याचा आरसा असतो या उक्तीप्रमाणे शहर सोयीसुविधांनी सुसज्य असणे अपेक्षित असते. शहरात विकास योजना राबवली जात आहे, त्यादृष्टीने शहराचा विकास आराखडा तयार होत आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने या योजनेमध्ये नागरिकांनी नोंदवलेल्या मतांचा आदर करणे महत्वाचेच शकते. भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ संवरचनेचे असल्याने मुळातच विस्कळीत स्वरुपात मंडणगड शहर बसल्याने येथील भौतिक विकासात येणाऱ्या अडचणींचे आव्हान नगरपंचायतीस नक्कीच आहे. मात्र सर्वाच्या सहभागाने आराखडा प्रभावीपणे राबवून शिस्तबद्ध शहराची रचना करता येऊ शकते.

अनियोजित वाहतूक कोंडी, शहरीकरणामुळे झोपडपट्ट्या, पाणीटंचाई, प्रदूषण यांसारख्या समस्या उद्भवतात. विकास आराखडा या समस्यांना नियंत्रित करतो आणि सुनियोजित विस्ताराला प्रोत्साहन देतो. पायाभूत सुविधांचे नियोजन महत्वाचे आहे. बाजारपेठ, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, शैक्षणिक, आरोग्य यांसारख्या सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शहर संकल्पनेतील शहराचे नियोजन करतना स्मार्ट सिटी साठी प्रयत्न व व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी योग्य नियोजन तितकेच अपेक्षित आहे. मंडणगड शहराचा शहर विकास आराखडा तयार करताना स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणीय बाबी, आर्थिक क्षमता आणि भविष्यातील वाडीचा विचार करणे आवश्यक आहे. मंडणगड छोटे शहर असल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागात वसलेले आहे त्यामुळे त्याचा विकास आराखडा स्थानिक संस्कृती, पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर आधारित असावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मंडणगड ग्रामीण व निमशहरी भागात वसलेले असल्याने मुळ वस्ती ही वाडीवस्ती वर केंद्रित झाली आहे. शहर विकास आराखडा बनवताना या दाट वस्तीच्या वाड्यांचा विचार करणे आवश्यक आहे. जे रस्ते नियोजनात दाखवले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची घरे बाधित होणार आहेत. शहराची भौगोलिक स्थिती लक्षात घेता एवढ्या रुंदीचे रस्ते बनवणे अयोग्य ठरेल, त्यामुळे शहराचा विकास आराखडा बनवताना नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे- वैभव कोकाटे, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत, मंडणगड.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 11/Jul/2025