संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे धडकेत मजुराचा मृत्यू

रत्नागिरी, संगमेश्वर, गुरुवार, १० जुलै २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेने एका ३९ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. हा मजूर केरळ येथे रस्त्याच्या कामासाठी जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजू रामविलास यादव (वय ३९ वर्षे, रा. हातिमपूर, जि. देवरिया, राज्य उत्तरप्रदेश) हे खबर देणारे इंदलकुमार श्रीप्रसाद (रा. हाटा, जि. कुशीनगर, उत्तरप्रदेश) यांच्यासोबत रस्त्याचे बांधकाम करून मजुरी करण्यासाठी आले होते. हे दोघे केरळ येथे रस्त्याच्या गटाराचे कॉंक्रिटचे काम करण्यासाठी १६/०६/२०२५ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास गोरखपूर, उत्तरप्रदेश येथून गोरखपूर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रेल्वेगाडीने निघाले होते.

१८/०६/२०२५ रोजी मुंबई येथे उतरल्यानंतर, केरळला जाण्यासाठी त्यांनी नेत्रावती एक्सप्रेस गाडीच्या जनरल डब्यातून प्रवास सुरू केला. ही रेल्वेगाडी सायंकाळी ६.११ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबली असता, राजू यादव हे रेल्वेच्या रुळाच्या बाजूला उभे राहून लघुशंका करत होते. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसची त्यांना धडक बसली.

या धडकेमुळे राजू यादव यांच्या हाताला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने एका खाजगी ॲम्बुलन्सने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना, १८/०६/२०२५ रोजी रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिनांक १०/०७/२०२५ रोजी दुपारी २.०३ वाजता आमू. क्रमांक २०/२०२५, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगमेश्वर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 11-07-2025