घुडेवठार : येथील श्री एकमुखी दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कीर्तनकार ह.भ.प. सौ. सायलीताई मुळे दामले यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार आणि पाटीलवाडी येथील ग्रामस्थ तसेच अनेक दत्त भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायलीताईंनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी श्री एकमुखी दत्त मंदिरात कीर्तन करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दत्त मंदिरात कीर्तन परंपरा अखंड चालू राहावी, अशी दत्तचरणी प्रार्थना केली.
कार्यक्रमाच्या शेवटी, कीर्तनकार सायलीताई दामले, तबलावादक श्री कैलास दामले आणि हार्मोनियमवादक श्री महेश दामले यांचा श्री दत्त प्रतिमा आणि शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री सुरेश मालगुंडकर, सौ. सत्यवती बोरकर, सौ. रूपा नागवेकर, श्री मुकुंद विलणकर, श्री विशाल विजय मुंडये, सौ. माणिक मुंडये, जय बोरकर, शुभम नागवेकर, अनमोल उदय मुंडये, अनिश घुडे, जान्हवी घुडे आणि स्वप्नील रांदपकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भक्तिमय सोहळ्याने गुरुपौर्णिमेचा आनंद द्विगुणित केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 11-07-2025














