चिपळूण : उक्ताड ते मिरजोळी मार्गावर जीवघेणे खड्डे

चिपळूण : तालुक्यातील गुहागर- विजापूर मार्गावरील उक्ताड ते मिरजोळी या रस्त्यावर पावसाळा सुरू झाला की, खड्ड्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाऱ्या प्रवाशांना दरवर्षी खड्ड्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो. उक्ताड ते मिरजोळीदरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे कोणत्या वर्षी हा रस्ता खड्डेमुक्त होईल, असा संतप्त प्रश्न केला जात आहे.

उक्ताड गणेश मंदिर ते मिरजोळी साई मंदिर या दरम्यानचा रस्ता हा अर्धा चिपळूण नगर परिषद, तर अर्धा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणच्या अखत्यारीत येतो. दोन्ही प्रशासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या या रस्त्याला दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुख्यत्वे करून उक्ताड गणेश मंदिर जवळ, लाइफकेअर बायपास तसेच मिरजोळी येथील अजिंक्य पेट्रोल पंपच्या समोर खड्डे पडतात. मात्र, या खड्ड्यांच्या बाबतीत कोणतीही ठोस उपाययोजना संबंधित विभागाकडून केली जात नाही.

मे महिन्यामध्ये खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, महिनभरातच पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत चिपळूण दिव्यांग संस्था पदाधिकारी संतोष होळकर, ओंकार साळवी, संगीता काजारे, अशोक भुस्कुटे, विनोद पवार, विनोद हिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:17 PM 11/Jul/2025