लांजा नगरपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत लवकर सुनावणी

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या प्रारूप विकास योजना आराखड्याबाबत आलेल्या हरकर्तीवर सुनावणीकरिता नगरपंचायतीच्या वतीने हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्य समितीकडून हरकतींवर सुनावणी होणार असून, या संदर्भात लवकरच पत्रव्यवहार करून सुनावणीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

शहर प्रारूप विकास आराखडा २७ मार्च २०२५ रोजी जाहीर केला होता. या आराखड्याबाबत हरकती घेण्याची शेवट तारीख २८ एप्रिल देण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या रोषामुळे १५ मेपर्यंत मुदत वाढवली होती. अखेर मुदत संपल्यानंतर विकास आराखड्याविरोधात नगरपंचायतीकडे तब्बल १५०० हरकती अर्ज आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक डॉ. प्रतिभा भदाणे यांनी तीन सदस्य असलेली समिती नेमली आहे. यामध्ये नगररचना विभागाचे सेवानिवृत्त सहायक संचालक मिलिंद आवडे, सेवानिवृत्त नगररचनाकार शिवप्रसाद धुपकर आणि सेवानिवृत्त नगररचनाकार चंद्रशेखर तायशेटे या तीन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची या समितीवर नियुक्ती केली आहे.

दरम्यान, याबाबत हालचाली सुरू झाल्या असून, नगरपंचायतीच्यावतीने हरकती दाखल केलेल्या व्यक्तींना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच प्रारूप विकास आराखडा हा ६ पत्रक (शीट) मध्ये जाहीर केला होता. त्यामुळे शीटमध्ये समाविष्ट भागांनुसार, पत्रव्यवहार करून वेगवेगळ्या तारखेला शीटप्रमाणे हरकतींवर सुनावणी होणार आहे. या संदर्भात लवकरच तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 12/Jul/2025