रत्नागिरी : जिल्ह्यात ४२५ ग्रामपंचायतीत महिलाराज

रत्नागिरी : निवडणूक विभागाच्या आदेशानुसार, २०२५ ते २०३० कालावधीकरिता ८४७ ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत १४ जुलैला होणार आहे. त्यातील ४२५ पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियमानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी तालुकानिहाय सरपंचांची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरिता २०२५ ते २०३० या कालावधीत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता आरक्षण तयार केले आहे.

त्यासाठी सरपंचपदाची संख्याही निश्चित केली आहे. सरंपचपदाच्या आरक्षणाची सोडत १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्या त्या तालुक्याच्या मुख्यालयात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. निवडणूक नियमातील तरतुदीनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नियमानुसार योग्य तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित करावयाच्या ग्रामपंचायतींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार सर्व तहसीलदारांना प्रदान केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी पारित केलेल्या आदेशाला अनुसरून शासनाने सरपंचपदांचे जिल्हानिहाय वाटप केले आहे. १३ जून २०२५च्या अधिसूचनेनुसार, पुढील ५ वर्षासाठी सरपंचपदांची जिल्हानिहाय संवर्ग संख्या निश्चित केली आहे. जिल्ह्यात एकूण ८४७ ग्रामपंचायती आहेत. त्यातील खुल्या प्रवर्गात ठेवलेल्या असून, २८५ जागांवर महिलांसाठी २८६ जागा आरक्षित कोणालाही संधी दिली जाऊ शकते. इतर मागासवर्ग पदासाठी २२९ पैकी ११५ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गात ३६ पैकी १८ जागा तर अनुसूचित जमातीसाठी ११ पैकी ६ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 12/Jul/2025