गावागावांत काँग्रेसच्या ग्राम कमिट्या तयार करा : अॅड. हुस्नबानू खलिफे

राजापूर : काँग्रेसची सत्ता घालवायला विद्यमान सत्ताधाऱ्यांना ७० वर्षे लागली; पण, आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना विद्यमान महायुती सरकार घालवायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे आतापासूनच गावागावांत जाऊन काँग्रेस पक्षाच्या ग्राम कमिट्या तयार करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती गटनिहाय दौरे करून पक्ष बांधण्याची सुरुवात करा, असे आवाहन विधान परिषदेच्या माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी केले.

राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार खलिफे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, तालुकाध्यक्ष राजू राणे, माजी तालुकाध्यक्ष सुभाष वाकाळकर, माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, राजापूर अर्बन बँकेच्या माजी चेअरमन अनामिका जाधव, शहराध्यक्ष आजीम जैतापूकर उपस्थित होते.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष खामकर यांनी राजापूर तालुक्यामध्ये माजी राज्यमंत्री भाईसाहेब हातणकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेस पक्षाबद्दल आत्मियता असलेले जुनेजाणते कार्यकर्तेही आहेत. जुन्या नव्या सर्व कार्यकत्यांना सोबत घेऊन सर्वांनी एकत्रित काम करत काँग्रेस पक्षाला पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी आबा आडिवरेकर, सुरेश कोळेकर, मुमताज काझी, स्नेहा कुवेस्कर, देवदत्त वालावलकर, बाजीराव विश्वासराव उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 12/Jul/2025