रामपूर : परमेश्वराने आपल्याला अनेक देणग्या दिल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची देणगी म्हणजे संवाद. मानवी जीवनात संवादाला खूपच महत्त्व असून, संवादातून सुसंवाद व सुसंवादातून सुखसंवाद झाला पाहिजे, असे प्रतिपादन दूरदर्शनच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका व संवादिका दीपाली केळकर यांनी केले.
चिपळूण पंचायत समिती शिक्षण विभाग, चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने मिरजोळी येथील दलवाई हायस्कूल येथे आयोजित मुख्याध्यापक कार्यशाळेत ‘सुसंवादाचे दहा मंत्र’ या विषयावर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, दैनंदिन जीवनात कसं बोलावं याची काही सूत्र आहेत. यामध्ये सहजता, सुलभता, सुंदरता, प्रसन्नता, गंभीरता, नवीनता, कल्पकता, समयसूचकता, तत्परता, अर्थपूर्णता आणि नम्रता ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे आपण सकारात्मक, प्रेमाने, आत्मीयतेने व जिव्हाळ्याने बोलावे. मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये ही सूत्रे वापरल्यास शाळांमध्ये सुसंवाद राहील, असे त्या म्हणाल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर दलवाई हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे चेअरमन खालिद दलवाई, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष संजू वाघमारे, सचिव शंकर गलांडे, मुख्याध्यापक रोहित जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी हस्ताक्षर स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त रागिणी आरेकर, कला शिक्षक सुशील कुंभार, उदय मांडे, राजेंद्र जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले, आभार शंकर गलांडे यांनी मानले तर सूत्रसंचालन धनाजी देसाई यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 16/Oct/2024