गुरुजनांचे मार्गदर्शन म्हणजे ज्ञानरूपी आशीर्वादच : जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

चिपळूण : गुरुजनांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन म्हणजेच ज्ञानरूपी आशीर्वाद असून त्यांच्यामुळेच विद्यार्थ्यांचे जीवन उजळते, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले तसेच मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक आणि शैक्षणिक उद्देशाने करावा; अन्यथा त्याचा गैरवापर विद्यार्थ्यांना नैराश्याच्या गर्तेत नेऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

चिपळूण तालुका विधी सेवा समिती व श्रीराम शिक्षणसंस्थेचे परांजपे मोतीवाला हायस्कूल यांच्या वतीने कायदेविषयक जागरूकता शिबिर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्याध्यापक किरण कांबळे आणि अॅड. नयना पवार हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरू-शिष्य परंपरेचा पवित्र इतिहास, गुरूंच्या संस्कारांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्थान याबाबत डॉ. नेवसे यांनी अत्यंत प्रेरणादायी आणि मनोवेधक मार्गदर्शन केले. यावेळी नेवसे म्हणाल्या, गुरु हेच विद्यार्थ्यांचे खरे प्रेरणास्थान, जीवनदर्शक आणि सन्मार्गदर्शक असतात. संस्कार, शिस्त आणि नियोजन या त्रिसूत्रीचे पालन करून विद्यार्थ्यांनी ध्येय गाठले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रातील तांत्रिक क्रांतीचा योग्य वापर झाला पाहिजे.

या कार्यक्रमात अॅड. नयना पवार यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे मूलभूत हक्क, सायबर गुन्हे, अमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि मोबाईल-इंटरनेटचा सजग वापर या विषयांवर मार्गदर्शन केले. बालकांचे हक्क आणि सुरक्षाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना समजेल, अशा सोप्या भाषेत त्यांनी सांगितली. सूत्रसंचालन सोनाली मुंजेकर आणि सिद्धी रेडीज यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 12/Jul/2025