चिपळूण : घरकुलाचे बांधकाम जमीनदोस्त केल्याचा गंभीर प्रकार; दोषींवर कारवाईची तहसीलदारांकडे मागणी

चिपळूण : कादवड सुतारवाडी येथील शासकीय योजनेत्त मंजूर झालेल्या घरकुलांचे काम जोत्यापर्यंत पूर्ण झाल्यानंतर काही स्थानिकांनी जबरदस्तीने हे बांधकाम जमिनदोस्त केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाभार्थ्यांचा मुलगा संदीप जनार्दन सुतार यांनी तहसीलदारांना निवेदन देत दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास कुटुंबासह उपोषणाचा इशारा दिला आहे.

जनार्दन सुतार यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून २०२४-२५ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. कादवड, रामवाडी येथील दिलीप रघुनाथ शिंदे यांनी आपल्या आईच्या तोंडी संमतीने त्यांना शेतातील एक भाग घरकुलासाठी देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर शिंदे यांनी तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी संमतीही दिली होती. या आधारे प्रस्ताव मंजूर होऊन पहिला हप्ता १५ हजार रुपयेही खात्यात जमा झाला होता. पुढे मनोहर विठोबा सुतार आणि दिलीप शिंदे यांनी या बांधकामाला विरोध सुरू केला. तोंडी धमक्या देत, घाबरवून ग्रामपंचायतीला अर्ज केले, प्रतिज्ञापत्र रद्द करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विस्तार अधिकारी केळस्कर यांनी मध्यस्थी करून दोघांना समज दिली; पण तरीही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. ६ जुलैला संदीप सुतार यांच्या अनुपस्थितीत दिलीप शिंदे, मनोहर सुतार आणि त्यांच्या पत्नीसह आणलेल्या आठ-दहा मजुरांनी घराचे जोत्यापर्यंतचे बांधकाम उद्ध्वस्त केल्याचा आरोप निवेदनातून संदीप सुतार यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 12/Jul/2025