डी.बी.जे. महाविद्यालयाला यु.जी.सी.कडून शैक्षणिक स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त

चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे डी.बी.जे. महाविद्यालय ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

याशिवाय आनंदाची बाब म्हणजे नुकताच मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या डी.बी.जे. महाविद्यालयाला यु.जी.सी. कडून स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शैक्षणिक स्वायत्तता सलग ३ वर्षे A ग्रेड असलेल्या महाविद्यालयांनाच दिली जाते. डी.बी.जे. महाविद्यालय हे सलग ३ वेळा A ग्रेड प्राप्त करणारे महाविद्यालय असल्यामुळे महाविद्यालयाला शैक्षणिक स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे यांनी दिली.

डी.बी.जे. महाविद्यालयात याच विषयासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डी.बी.जे. महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाली असली, तरी महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशीच कायम सलंग्न राहणार आहे. ही प्राप्त झालेली स्वायत्तता मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत शैक्षणिक स्वायत्तता असणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक (मार्कशीट) तसेच पदवी प्रमाणपत्र (सर्टिफीकेट) व इतर कागदपत्रावरती महाविद्यालय व मुंबई विद्यापीठाचे नाव व लोगो कायम राहणार आहे. महाविद्यालय स्वायत्त झाल्यामुळे होणारे फायदे खूप आहेत असे चेअरमन मंगेश तांबे यांनी सांगितले. त्यानंतर प्रा. शिल्पा सप्रे यांनी सांगितले की, महाविद्यालयाचा परीक्षा विभाग हा पूर्णपणे महाविद्यालयाच्या अखत्यारीत असणार आहे. यामुळे परीक्षेच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी महाविद्यालयीन स्तरावर सोडविण्यात येतील. परीक्षा व निकालाचे कामकाज योग्य वेळेत पूर्ण करता येईल. तसेच विद्यार्थ्यांना मार्कलिस्ट व इतर कार्यालयीन कामासाठी विद्यापीठावर अवलंबून रहावे लागणार नाही. अशा अडचणीतून विद्यार्थी व पालकांची होणाऱ्या मनस्तापा पासून सुटका होईल. मुंबई विद्यापीठाचा प्रचलित आराखडा कायम असेल परंतु आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने येथील निसर्ग, पर्यटन, सागरी किनारा, औद्योगिक वसाहती याचा विचार करुन व काळाची पाऊले ओळखून इथे नवनवीन अभ्यासक्रम सुरु करता येतील. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती (Governing body) आणि विद्या परिषद (Academic Council) तसेच विविध विषयांची अभ्यास मंडळे (Board of Studies) ची स्थापन होईल. त्यामुळे स्थानिक गरजेनुसार नोकरी व व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम तयार करता येईल. यामुळे नोकरी व रोजगार निर्मितीसाठी फायदा होईल तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर निर्णय घेता येईल अशी त्यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव बापट यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या कला, क्रीडा सांस्कृतिक, आविष्कार, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यापीठाच्या इतर सर्व उपक्रमामध्ये महाविद्यालयाचा पूर्वीप्रमाणेच सहभाग असणार आहे. हे सर्व करीत असताना अभ्यासक्रमांच्या ‘फी’ मध्ये कोणताही बदल होणार नाही. यासाठी पालक/विद्यार्थी यांच्यावरती कोणत्याही स्वरुपाचा जादा आर्थिक भार येणार नाही. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना, शिष्यवृत्ती व फी सवलत या नेहमी प्रमाणे सुरु राहतील. महाविद्यालय स्वायत्त जरी असले तरी महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती आणि विद्या परिषद यावर शासन आणि विद्यापीठ यांचे प्रतिनिधी असल्यामुळे महाविद्यालयाच्या सर्व कामकाजावर त्यांची देखरेख राहील, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, प्रा. डॉ. शिल्या सप्रे-भारमल, संचालक रेडिज सुचय, अविनाश जोशी, निरंजन रेडिज, संजीव खरे, फैसल कासकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 12-07-2025